Thursday, February 11, 2016

वपु

Monday, February 8, 2016

चारचौघी : या जगण्यावर…

चारचौघी : या जगण्यावर…

डॉ. नीलम ताटके
‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असं आपल्याला मंगेश पाडगावकर यांनी सांगितलंय. जगणं कसं असावं याची जाणीव करून दिलीय. परंतु जगण्यावर प्रेम करायचं म्हणजे काय, एखादी व्यक्ती, वास्तू, वस्तू जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं त्याचं अस्तित्व जाणवतं त्या सगळ्यावर आपण प्रेम करू शकतो. मग जगण्यावर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय? हे मला श्रीमती शांताबाई शेळके यांचं ‘धूळपाटी’ वाचल्यावर कळलं.
आपल्या आसपासचा निसर्ग, माणसं, घर या सगळ्याविषयी असलेली आस्था, तन्मयता. माणसांविषयी बारीक-सारीक निरीक्षणं, स्वत:ने केलेल्या प्रत्येक लिखाणावर, आयुष्यात आलेले अनुभव यांच्याकडे सकारात्मतेने पाहणे, भाषांतरं, परीक्षण, स्तंभलेखन अगदी परीक्षांची गाईड लिहिणे, या प्रत्येकातून आपण शिकलो असे त्या म्हणतात. पोटासाठी कराव्या लागलेल्या इंग्रजी सिनेमाविषयीचे लिखाण असो, व्याख्यानं देण्याची सवय नसताना, गरज म्हणून ते केलं तेही अगदी उत्कृष्टपणे. बेकारीचा काळ हा संकट नाही तर तो आत्मभान देणारा काळ असतो असं त्यांना जाणवतं.
आयुष्यात अनेक माणसं भेटली. त्यांनी आपल्याला मदत केली. आपल्या लेखनात त्यांचा वाटा श्रीमती शांताबाई मानतात. अनंत अंतरकर, आचार्य अत्रे यांचा आवर्जून उल्लेख करतात.
काही व्यक्ती ज्या त्यांच्या नात्यातल्या होत्या, आसपास वावरणार्‍या होत्या त्यांचा शांताबाईंच्या मनावर ठसा उमटला. त्यात त्यांचे आई, वडील, आजोबा, आबई यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांच्या आजोबांनी म्हणजे वडिलांच्या वडिलांनी स्वत:च्या मुलांना व मुलींना त्या काळात आवर्जून शिक्षण घ्यायला लावले. मुलींना नोकर्‍या लावून स्वावलंबी केले याचा त्यांना अभिमान आहे. त्यांच्या आईला असलेली वाचनाची अतिआवड शांताबाईमधे आली आणि तीच पुढे त्यांची करीयर झाली. या वाचनाने त्यांना घडवलं.
जीवन जसं समोर येईल तसं जगावं असा त्यांचा विश्‍वास असल्याने पुढे आयुष्यात अमुक तमुक करायचं हे ठरवणं त्यांना मान्य नव्हतं, फक्त प्राध्यापक व्हायचा निर्णय हा त्याला अपवाद होता. आयुष्य जसं आलं तसं त्यांनी ते स्वीकारलं.
या शांताबाईंच्या आठवणी तर आहेतच, पण याला सामाजिक संदर्भ आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यात त्यांनी सत्तर-बहात्तर वर्षांपूर्वीची समाजरचना, जाती संस्था, कुटुंबात शिक्षित व्यक्ती असल्यावर कुटुंबातील वातावरण कसे असते ते त्यांनी मांडले आहे.
नोकरीच्या निमित्ताने मुंबईला गेल्या आणि त्यांना मुंबईही आवडली. दयानंद कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना वेगवेगळ्या भाषा बोलणारी, शिक्षणाची खरी गरज असलेली मुले, विद्यार्थी भेटले. या सगळ्या वातावरणात त्या समरसून गेल्या.
या समरसतेतूनच त्यांनी सुंदर कविता लिहिल्या, गीतं लिहिली, जी आजही आपल्याला खूप आनंद देऊन जातात, आपला मूडच बदलून टाकतात.
‘धूळपाटी’ हा एक रसरशीत जीवनानुभव आहे. ज्या गोष्टी अत्यंत खासगी आहेत किंवा वाचकांना त्या कळून किंवा नकळून काहीच फरक पडणार नव्हता त्या त्यांनी सांगायच्या टाळल्या आहेत. प्रत्येक अनुभवात रमणे व करायची असलेली प्रत्येक गोष्ट आत्मीयतेने करणे हेच कदाचित जगण्यावर प्रेम असावं.

http://www.saamana.com/utsav/charchaughi-ya-jagnyavar

Saturday, February 6, 2016

कधि कुठे न भेटणार

कधि कुठे न भेटणार
कधि न काहि बोलणार
कधि कधि न अक्षरात
मन माझे ओवणार

निखळे कधि अश्रू एक
ज्यात तुझे बिंब दिसे
निखळे निःश्वास एक
ज्यात तुझी याद असे

पण तिथेच ते तिथेच
मिटुनि ओठ संपणार
व्रत कठोर हे असेच
हे असेच चालणार
~  इंदिरा संत

मी तुझाच मध्ये उमा गोखले यांनी
गायलेली इंदिरा संत यांची कविता ..

Uma Gokhale sings kadhi kuthe n bhetnar: http://youtu.be/N2Rrbwnw6vg

Friday, February 5, 2016

सोबती सख्या रे तू असासोबती सख्या रे तू असा
विहरतो नभी पक्षी जसा...

तू दिशा तू माझे पंख तू ..
प्रीत तू सुखाचा आरसा ..

गुंतली तुझ्या नादात मी ..
धुंद दे जरी तू राजसा रे

ऊन पावसाळी
तू सावळा कवडसा

बावरी अशी मी
तू पाहुणा ऋतूचा

बदलता रंग तू
मनी स्वछंद तू
सख्या रेशमी सुराचा गंध रे तू...

- गजर चित्रपट गीत

Friday, January 22, 2016

ज्यांची हृदये

Monday, January 18, 2016

अखेरी इथुनीच आरंभ होतोअखेरी इथुनीच आरंभ होतो
पुन्हा त्याच चक्रात गुंतून जातो
नको वाटतो कोंडमारा  जीवाचा
तरी परतुनी जीव गर्भात येतो
अजन्म्या त्या  एकदा भेत्न्यासी
न  जाने कितीदा  मी जन्मास येतो
उरे तोच तो   एक प्रश्नार्थ कोहम
पुन्हा मी स्वतःचा खुला शोध घेतो
अखेरी इथूनीच आरंभ होतो
~ रेश्मा कारखानीस
मी शून्य काव्यसंग्रह 

Thursday, January 14, 2016

जो जे वांछिल तो ते लिहो

जो जे वांछिल तो ते लिहो

ज्ञानेश्वर मुळे 
म.टा

ख्यातनाम लेखक-कवी आणि भारताचे अमेरिकेतील कौन्सुल जनरल ज्ञानेश्वर मुळे यांची दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २७व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मराठी भाषेच्या भवितव्याबरोबरच जगभरातील बदलत्या वाचनसंस्कृतीचा त्यांनी केलेला हा ऊहापोह... 

आज पुस्तकांचं स्वरूप आमूलाग्र बदललं आहे. वाचनाचं स्वरूपही बदललं आहे. पूर्वी पुस्तकं वाचनालयातून किंवा मित्रांच्या घरातून आणावी लागत. पुस्तकं चोरूनही लोक वाचायचे. आज किंडल नावाचं माध्यम आहे, ज्याच्यामार्फत तुम्ही पुस्तकं चाळू शकता, साठवू शकता, वाचू शकता आणि विकत घेऊ शकता. पुस्तकांबरोबरच वृत्तपत्रे, मासिके अन्य प्रकारची वाचन सामग्रीही उपलब्ध आहे. जगभर साधारण दोनेक कोटी लोक आज ई-वाचक आहेत आणि किंडल आणि तत्सम उपकरणे महिन्याला वीसेक लाख पुस्तकं विकतात. पुण्यात ई-साहित्य नावाची संस्था आहे, त्या संस्थेनं शेकडो मराठी पुस्तकांचं ई-मेलद्वारे मोफत वितरण केलं आहे. मीही त्यांचा वाचक आहे. पूर्वी पुस्तकं कोल्हापुरातून कॅलिफोर्नियात एका क्षणात पाठवणं शक्य नव्हतं. आज मात्र अनेक पुस्तकं एका क्षणार्धात मला इंटरनेट उपलब्ध करून देतं. 

डिजिटल आशयाने मुद्रित अक्षरावर बऱ्याच अंशी विजय मिळवला आहे. मटापासून पुढारीपर्यंत सगळी मराठी वृत्तपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. पुस्तक उद्योगात इलेक्ट्रॉनिक पुस्तकांची वाढ सर्वाधिक आहे. अॅमॅझॉन डॉट कॉम कंपनी पारंपरिक पुस्तकांचे आणि ई पुस्तकांचे वितरण करते. त्यांच्या एकूण पुस्तकांपैकी ३० टक्के पुस्तके आता ई पुस्तकांच्या स्वरूपात वितरित केली जाताहेत. अॅमॅझॉन कंपनीने आतापर्यंत करोडो पुस्तकांचे वितरण केले आहे. 

पण या नवीन क्रांतीने नव्या संधी आणि नवी आव्हाने उभी केली आहेत. अमेरिकेतील पुस्तकांच्या दुकानांची संख्या चार हजारवरून दोन हजारावर आली आहे. पारंपरिक दुकाने आता फक्त एकूण पुस्तकांच्या दहा टक्के पुस्तके विकतात. या व्यवस्थेमुळे पूर्वीच्या तुलनेने पुस्तक वितरणातील नोकऱ्या जवळजवळ ६६ टक्के कमी झाल्या आहेत. 

व्यक्तिश: ई-पुस्तकांचा फायदा मला होत असला तरी पुस्तकांच्या दृश्य स्वरूपात होणारा हा बदल मला खूप अस्वस्थ करतो. पुस्तक हातात घेण्यातलं सुख, ते आई-वडिलांना, मुलांना किंवा मित्र-मैत्रिणींना वाचून दाखवण्यातली गंमत, कवितांच्या ओळी वहीत लिहून पाठवण्यातला आनंद दिवसेंदिवस घटत चाललाय. आजकाल ई-मेल, व्हॉटस्अॅप, सायबर, फेसबुक आणि फेस टाइमच्या जमान्यात देखण्या देवालासुद्धा लोक संगणकावर किंवा स्मार्ट फोनवर दंडवत घालतात. 

याचे काही फायदेसुद्धा आहेत. आज इंटरनेटवर विश्वसाहित्यातील शेक्सपिअर, मिल्टनपासून मराठीतील अनेक पुस्तकं वाचायला मोफत उपलब्ध आहेत. पत्रव्यवहार करता येतो, भाषा शिकता येतात, जगभरच्या साहित्यिकांची माहिती एका क्लिकवरती मिळते आणि क्षणभरात संपूर्ण जगाशी संपर्क साधता येतो. 

पण मला भीती वाटते ती, गायब होत चाललेल्या मानवी स्पर्शाची. कोल्हापुरात असताना करवीर नगर वाचन मंदिराबरोबर आमचं एक नातं जुळलं होतं. तिथली कपाटातली पुस्तकं, तिथं ऐकलेली व्याख्यानं, तिथं रंगलेली कविसंमेलनं आणि भाषणस्पर्धा, तिथली बाकडी सगळं आजही स्पष्ट आठवतं. असंच नातं अजब पुस्तकालय, महाराष्ट्र ग्रंथ भांडार या पुस्तकांच्या दुकानांशी होतं. तिथं जाऊन कधी दुरून तर कधी जवळून नवीन पुस्तकांकडे बघणं हा आनंद होता. पुस्तकांच्या मदतीनं अत्यंत शिताफीनं पत्रांची किंवा मोरपिसांची देवाणघेवाणही ग्रंथालयातच व्हायची. पूर्वी चित्रपटात नायक-नायिका हमखास ग्रंथालयातच भेटायचे. कारण ग्रंथ 'कबाब में हड्डी' होत नाहीत. लुडबुड आणि फालतू चौकशा करत नाहीत. पण सर्वंकष प्रेमाचे सेतू बांधतात. पुस्तकांचे आणि ग्रंथालयांचे हे मनोरम उपयोग आता इतिहासजमा होणार याची मला भीती वाटतेय. 

खरंतर ग्रंथालयांविषयीची अनास्था मला विदीर्ण करून टाकते. आमच्या गावात जर सुभाष वाचनालय नसतं तर मी घडलो नसतो. मी मॉस्कोतील लेनिन वाचनालयात जात असे. ते इतके विशाल आहे की, धावती भेट घ्यायची तरी दोन तास लागतील आणि प्रत्येक पुस्तकाच्या कपाटाला पाच मिनिटं द्यायची ठरवली तरी कित्येक वर्षं जातील. जगातल्या पहिल्या तीस वाचनालयात आपल्या देशातील एकही वाचनालय नाही. प्रथम क्रमांकावर १७ कोटी पुस्तकांचे ब्रिटिश ग्रंथालय आहे. आपला देशाभिमान आपण सर्वांसाठी स्वच्छतागृहे व वाचनालये बांधण्यात खर्च केला तर केवढे सुंदर होईल? वाचन संस्कृतीला प्रोत्साहन म्हणजेच मानवी प्रतिभेला खतपाणी आहे हे आपण का विसरतो? 

आपल्या साहित्याचं प्रयोजन काय असावं, हे ज्यानं त्यानं ठरवावं. प्रयोजन नसलं तरी चालेल कारण तोही लेखनस्वातंत्र्याचा भाग आहे. 'जो जे वांछिल तो ते लिहो' हे एकदा आपण मान्य केलं तर त्यापुढे वाद घालण्यात अर्थ नाही. पण हेही खरं की लेखन स्वातंत्र्य अमर्याद आहे पण ते अनिर्बंध नाही. त्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि संविधानिक चौकट आहे. जसं साहित्यिकाला लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे तसंच वाचकाला वाचण्याचं, न वाचण्याचं आणि संविधानिक मार्गांनी टीका करण्याचा किंवा निषेध करण्याचा अधिकार आहे. 

सहिष्णुतेची सध्या चर्चा सुरू आहे. सहिष्णुता हे सुसंस्कृतपणाचं आद्य लक्षण आहे. असहिष्णुतासुद्धा इतिहासपूर्व काळापासून आढळते. त्यातून भांडणे, विनाश, नरसंहार उद्भवलेत. प्राचीन काळापासून भारताने सहिष्णुतेचा स्वीकार आणि असहिष्णुतेचा धिक्कार केला आहे. असहिष्णू तत्त्वे जगात सर्वत्र आढळतात, तशी ती आपल्याकडेही कधी कधी डोके वर काढतात. या तत्त्वांना भारतीय संस्कृतीत स्थान नाही. म्हणूनच जगभरात भारताचा गौरव होतो. 

मी सध्या न्यूयॉर्कमध्ये राहतो. या शहराला अनेक लोक जगातील सर्वात गतीशील, कल्पक आणि सर्जनशील शहर मानतात. हे शहर म्हणजे जगातल्या प्रतिभावंतांसाठीचा चुंबक आहे. असं काय आहे या शहरात त्यामुळे शहराला असं स्वरूप मिळालं? कशासाठी दरवर्षी पाच कोटी लोक या शहरात पर्यटनाला येतात? याची मला समजलेली तीन कारणं सांगावीशी वाटतात. 

पहिली गोष्ट म्हणजे या शहरात ८०० विविध भाषा बोलणारे लोक राहतात. इथल्या सरकारी शाळांमध्ये १७६ भाषांची मातृभाषा म्हणून नोंद आहे आणि सर्वाधिक विविधतेनं भरलेल्या इथल्या क्वीन्स भागात १३८ भाषा बोलल्या जातात. तुम्ही जगभरच्या 'भाषा' आपल्या मानता तेव्हाच प्रतिभेचा विस्फोट होतो. सर्जकतेला मूर्तिमंत रूप येतं. 

मराठी माणसाने आपल्या अस्मितेची नवीन व्याख्या तयार करण्याची वेळ आली आहे. मराठीची सीमा महाराष्ट्रापुरती नको. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची घोषणा करून महाराष्ट्र धर्म वाढवला. सागरी आरमाराची स्थापना करून नवीन दृष्टी दिली. आपण मात्र घोषणाबाजीत अडकून मराठीच्या अवकाशाची गळचेपी करत आहोत. इतरांना आपल्या संस्कृतीत प्रवेश नाकारण्याऐवजी आमच्या संस्कृतीचा झेंडा अटकेपार फडकावणं अधिक रोमांचक आणि सार्थक नाही का? 

Saturday, January 9, 2016

पाय कुठे चालले


पाय कुठे चालले 
वाट काय बोलते 
एक दिशा बोलवते 
अन मागे ही ओढते ।

माया की छाया ही
जोजवते सावली 
पंखांना बळ देऊनिया 
हाक देते माऊली।

पंथ दिला ओढ दिली 
वाट तूच दाखवली
मायेतून गुंतवले 
तूच पुन्हा साद दिली।

जन्माच्या चक्राची
वारी तू चालविली
पंखांशी बळ देऊनिया 
हाक देते माऊली।

नाव तुझे सुर तुझा
कंठातुन दाटला
भक्तिचा सोहळा मी 
डोईवर थाटला।

माऊली।
लेकराच्या डोळी
भोळ्या विठ्ठलाची बाहुली
वारी तू चालविली
पंखांशी बळ देऊनिया 
हाक देते माऊली। 
~ गजर चित्रपट
‪#‎वारी‬


Fb @ https://www.facebook.com/EPrakashanMeMarathi/

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

COPYRIGHT

Creative Commons License
Me Marathi by Blogger is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at nurtureones.blogspot.in.
Permissions beyond the scope of this license may be available at http://nurtureones.blogspot.com/.

Pageviews last month

मराठी चित्रकविता

FOLLOW ME ON TWITTER

Follow vidyapalkar on Twitter

MARATHI BLOG

HIT COUNT